आळंदी दर्शन

॥ अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र,जिथे नांदतॊ ज्ञानराजा सुपात्र ॥
॥ तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वरांशी ॥

Language Settings
अलंकापुरी हे शिवपीठ | पूर्वी येथे होते नीलकंठ | ब्रम्हादिकीं तप वरिष्ठ | येथेंचि पै केले ||

हि आदिनाथ शंकरांच्या तपश्चर्येचीही जागा असून येथे अगस्तिप्रमुख हजारो तपोनिष्ठांनी वास्तव्य केले होते.शिवभक्तीचे,शिवोपासकांचे पीठ अशी पूर्वीपासून आळंदीची ओळख आहे त्याचे प्रमाण म्हणजे सिध्देश्वराचे मंदिर.हे अतिशय प्राचीन शिवलिंग आहे. शिवाय पंचक्रोशींतही अनेक पवित्र स्थाने आहेत.आळंदीच्या पूर्वेस मातुलिंग(मरकळ येथील केशवराज),दक्षिणेस पुण्याचा पुण्येश्वर,उत्तरेस भिमातीरी खेटकग्रामी म्हणजे खेड येथील सिध्देश्वर व पश्चिमेस इंदुरीचा ब्रम्हेश्वर.सिध्देश्वराच्या डाव्या बाजूस अजानवृक्षाच्या छायेखाली संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधीस्थान आहे.कालांतराने त्यावर मंदिराची स्थापना झाली.त्यामुळे हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बनले आहे. हरिहरेंद्र स्वामींच्या मठातील एक समाधीवर काही पुसट उल्लेख आढळतात.ते उल्लेख यादवकालीन असावेत असे तज्ज्ञांचे मत आहे. इतिहासकार राजवाडे यांच्यामते आळंदी हे गांव मध्ययुगातील आहे. शके ६९० च्या कृष्णराज राष्ट्रकुटांच्या तळेगाव ताम्रपटात आळंदी गावचा उल्लेख आढळतो. संत वाड्मयात अलंकापुरी,अलंकावती असे आळंदीचे उल्लेख आढळतात.

'अलं ददाति' म्हणजे पुरे म्हणण्यापर्यंत सर्व मनोरथ पूर्ण करणारी ती आळंदी. आळंदी येथील सव्वादिडशेवारखे या जिराफ शेतीचे १ खंडी २||मण श्रींच्या समाधीस छत्रपती शिवाजी महारांजानी एका सनदेद्वारे दिले होते. शके १५९३ मध्ये दिलेली हि सनद उपलब्ध आहे. त्यानंतर राजाराम महाराज, बाळाजी बाजीराव पेशवे, पहिले बाजीराव,अहिल्याबाई होळकर वगैरेंनी आळंदी गावाकडे लक्ष पुरविले आणि आळंदीला गावपण दिले.

आळंदीला इंद्रायणी नदीचा कृपाआशीर्वाद आहे.(इंद्रस्य अयनं यस्याम म्हणजे जिच्या तीरी इंद्राच्या तपाची जागा आहे) इंद्राने पृथ्वीवर येऊन येथे महायाग केला त्यामुळे नदीचे नाव इंद्रायणी असे पडले असी आख्यायिका आहे.काशीला जसे गंगेत डुबकी मारून आपले सर्व पाप धुतले जातात अशी लोकांची श्रद्धा आहे त्याचप्रमाणे इंद्रायणीत हि लोक डुबकी मारून आपण पापमुक्त होऊन परमार्थाकडे वळतो अशी श्रद्धा आहे.बरेच लोक त्यांच्या आप्तांचे अस्थी विसर्जन करण्यासाठी देखील आळंदीस येतात.गंगेप्रमाणे इंद्रायणीत अस्थी विसर्जन केल्याने मोक्ष प्राप्ती होते अशी लोकांची श्रद्धा आहे.हीच नदी पुढे जाऊन भीमेला,भामेला आणि शेवटी चंद्रभागेला जाऊन मिळते.

संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली. संत नामदेवांच्या जोडीने त्यांनी भागवत धर्म - वारकरी संप्रदायाचा प्रसार केला.७०० वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचे अनुयायी महाराष्ट्रात आजही लाखो संख्येने आहेत.वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीचे मोठे महत्त्व आहे.